सोलापुरात लीड कुणाला? प्रणितीताई की रामभाऊ ; M फॅक्टर ठरणार निर्णायक
सोलापूर : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी उत्साहात संपन्न झाले. सोलापुरात उन्हाचा तडाखा असल्याने मतदानाची आकडेवारी कमी झाली. काही किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान झाले. काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे.
बुधवारी सोलापुरात सर्वत्र एकच चर्चा ऐकण्यास मिळत आहे ती म्हणजे काय होईल, लीड कुणाला मिळेल, कोण निवडून येणारं, तुम्हाला काय वाटते असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सोलापुरात भाजप आणि काँग्रेस मध्ये सरळ सरळ लढत झाली, सुरुवातीला वैयक्तिक विषयावर प्रचाराला सुरुवात झाली, नंतर विकासाचा विषय पुढे आला, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मात्र भाजपने हिंदुत्ववादाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आणला. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली माघार, एमआयएम पक्षाने उमेदवार न देण्याचा घेतलेला निर्णय तसेच काँग्रेस पक्षाच्या अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीत काही नेत्यांकडून फडकवण्यात आलेले हिरवे झेंडे त्यामुळे भाजपच्या हातात आयते कोलीत मिळाले.
काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यांसोबतच संविधान बचाव हा विषय पुढे आणला. संविधानासाठी एमआयएम ने माघार घेतली. मुस्लिम समाजातून मतदान व्हावे म्हणून मशीदीतून मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
मशीदितून फतवे काढले जात असल्याचा मुद्दा भाजपने कायम प्रचारात घेतला. हिंदुत्ववाद पुढे आणला, अशी भडक भाषणे सुरु झाली. यातच देवेंद्र कोठे यांचा भाजप प्रवेश झाला, त्यांनी मुख्यमंत्री योगी यांच्या सभेत केलेले भडकाऊ भाषण या निवडणुकीत मुस्लिम समाजाला मतदानाला बाहेर काढण्याचे कारण ठरले आहे.
मुस्लिम समाज 40 ते 50 टक्के च्या वर मतदान करत नव्हता. तो यंदा 65 ते 70 टक्के पर्यंत मतदान केंद्रावर गेला. ती मते या निवडणुकीत निर्णायक ठरतील असे चित्र पाहायला मिळते आहे.
त्यातच मराठा आरक्षणावरून समाजामध्ये सत्ताधारी पक्षा बाबत नाराजीचा सूर दिसून आला. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दौरा केला. त्यांनी मराठा समाजाला महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले. बरीच मराठा नेते मंडळी महायुती सोबत होती. अचानक सोलापुरातून मनोज जरांगे पाटील यांचा दौरा झाला परंतु त्यांनी मतदानाबाबत कोणतेही भाष्य केले नाही त्यामुळे उघडपणे कुण्या एका पक्षाला मराठा समाज मतदान करताना दिसला नाही त्यामुळे त्यांचे मते यंदा निर्णय ठरणारी आहेत.
भारतीय जनता पार्टीचा एक गठ्ठा म्हणून मतदान करणारा समाज म्हणजे पद्मशाली अर्थात साळी. त्या समाजाने मोठ्या उत्साहाने मतदान केले, जय श्रीरामचा नारा त्या भागात जोरात होता. तसेच भाजपचा दुसरा मोठा गठ्ठा मतदार म्हणजे लिंगायत समाज. परंतु सिध्देश्वरची चिमणी पाडल्यानंतर धर्मराज काडादी यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला, ते प्रथमच राजकीय स्टेजवर दिसले त्यामुळे 2019 मध्ये जयसिध्देश्वर महाराज यांना मतदान केलेला लिंगायत समाज यंदा काहीसा काँग्रेसकडे वळाला. या समाजाची किती मते भाजपपासून काँग्रेसकडे जाणार यावरही भाजपचे भवितव्य अवलंबून आहे.
काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेला मोची समाज तसेच भटका विमुक्त जाती जमाती समाज. त्या समाजात भाजपने अनेक नेत्यांना फोडल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेच्या ज्योती वाघमारे या महायुतीत असल्याने त्यांनी आपला समाज भाजपकडे किती वळवला हा धोका काँग्रेसला आहे. ऐनवेळी काँग्रेसचे भारत जाधव भाजपच्या स्टेजवर गेल्याने त्यांनी त्या भागातील किती मते भाजपकडे वळवली हा मुद्दा सुद्धा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.
एकूणच या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार यामध्ये मुस्लिम आणि मराठा हा एम फॅक्टर निर्णायक ठरणार हे मात्र नक्की आहे.