शौकत पठाण, रियाज सय्यदसह सहा जणांवर गुन्हा दाखल ; सोलापुरात मतदारांना….
सोलापूर : मतदारांना स्लिप वाटण्यासाठी विनापरवाना मंडप उभारून उमेदवारांना घालून दिलेल्या नियमाचा भंग करण्याची घटना मंगळवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी हवालदार बाळू जाधव यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शौकत मुस्तफा पठाण, रियाज मुस्तफा सय्यद, ओंकार सुनील गायधनकर, संध्या सुनील नागरे, अनुप्रिया रमाकांत जाधव, मनिषा रमेश उड्डाणशिव (रा. सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.
मंगळवारी सकाळी शहरात सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरू होती. दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन उर्दू शाळेच्या गेटसमोर कंपाउंडलगत नमूद लोकांनी मंगळवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास काँग्रेस पक्षाच्या वतीने मतदारांना स्लिपा वाटण्यासाठी नमूदपैकी क्रमांक १ याने विनापरवाना मंडप उभारला. तेथे मतदार स्लिपा वाटण्यासाठी नमूद लोकांना बसविण्यात आले. उमेदवारांना दिलेल्या अटीचा भंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.