सुभाष देशमुखांची सचिन कल्याणशेट्टींना घेरण्यास सुरुवात ; सिद्धाराम म्हेत्रेंचा घेतला पाठिंबा
सोलापूर : कुणालाही अपेक्षित नसेल असे बाजार समितीच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत कायमच काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिलेली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता थेट भाजप आमदाराविरोधात भाजप आमदार अशी लढत होत आहे.
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलच्या विरोधात दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे पॅनल उभे केले आहे.
सुभाष देशमुख यांनी आता सचिन कल्याणशेट्टी यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. कल्याणशेट्टी यांचे राजकीय विरोधक, काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या निवासस्थानी सुभाष देशमुख यांनी भेट दिली. या ठिकाणी या दोन नेत्यांमध्ये चाय पे बरीच वेळ चर्चा झाली.
सुभाष देशमुख यांनी गुरुवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा पाठिंबा घेतला त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ते काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि पाठिंबा घेतला आहे.
त्या भेटीनंतर सिद्धाराम म्हेत्रे यांनी प्रतिक्रिया दिली की, मागची बाजार समितीची निवडणूक ही माझ्या नेतृत्वाखाली संपन्न झाली परंतु यावेळेस कोणीही मला भेटायला आले नाहीत बहुतेक सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे नेतृत्व असल्याने ते नेते माझ्याकडे आले नसतील. सुभाष देशमुख मोठ्या मनाने माझ्या निवासस्थानी आले. त्यामुळे मी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दक्षिण तालुक्यात येणाऱ्या ग्रामपंचायत, सोसायटी यातील आपले सर्व समर्थक देशमुख यांच्या पॅनल सोबत राहतील असे सांगितले.