सोलापूर शिवसेना शहरप्रमुख सचिन चव्हाण यांचे पद अडचणीत?
सोलापूर : सोलापूरच्या राजकारणात कुणालाही अपेक्षित नव्हते असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या सोलापूर शहर प्रमुख पदी सचिन चव्हाण यांची काही दिवसांपूर्वी नियुक्ती झाली. त्यामुळे शिवसेनेतीलच अनेकांना धक्का बसला. इतर राजकीय पक्षात सुद्धा हे काय नवलच घडले अशी चर्चा ऐकण्यास मिळाली.
सचिन चव्हाण यांचे शहरप्रमुख पद अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला कारण ही तसेच असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युवा सेना, महिला आघाडी, फादर बॉडी तसेच इतर अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते या निवडीनंतर नाराज असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे.
सचिन चव्हाण हे पक्षाचे सदस्य कधी झाले? त्यांचा शिवसेनेची कोणताही संबंध नसताना त्यांना शहर प्रमुख पद कसे काय देण्यात आले? असे प्रश्न आता सोलापुरातील कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहेत. शहर प्रमुख पदासाठी इच्छुक असलेले नेते सुद्धा पक्षाच्या अशा कारभारावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यामध्ये काम केलेल्या सचिन चव्हाण यांना शिवसेनेने सोलापूर शहराचे सर्वात मोठे शहर प्रमुख पद दिले. शहरात 25 पेक्षा अधिक शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्याचे भाकीत चव्हाण यांनी केले आहे. त्यांच्या निवडी मागे कुणाची आणि काय खेळी आहे, याबाबत सुद्धा आता सोलापुरातील युवासेना, महिला आघाडी, फादर बॉडी, विद्यार्थी सेना असे अनेकांचे शिष्टमंडळ लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निश्चितच सचिन चव्हाण यांचे शहर प्रमुख पद अडचणीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.