शेळकेंचा पत्ता कट ; दिवसभराच्या वेटिंग नंतर नरोळेंचे आले नाव, गणेश वानकरांना लॉटरी ; हे आहेत कल्याणशेट्टी, माने, हसापुरे गटाचे 15 उमेदवार
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आता सरळ दोन पॅनलमध्ये ही निवडणूक होणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या गटाच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल विरुद्ध आमदार सुभाष देशमुख प्रणित पॅनल अशी आता ही निवडणूक रंगणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. आमदार सचिन कल्याणशेट्टी, दिलीप माने सुरेश हसापुरे हे प्रमुख नेते दिवसभर शासकीय विश्रामगृहावर ठाण मांडून होते. पॅनलमध्ये जाण्यासाठी अनेक नेत्यांनी दिवसभर प्रयत्न केले. दुपारी बाराच्या सुमारास आपल्याला उमेदवारी मिळणार नाही याची चाहूल लागतात बाळासाहेब शेळके यांनी शासकीय विश्रामगृहातून काढता पाय घेतला.




माजी संचालक सिद्धाराम चाकोते, राष्ट्रवादीचे नेते किसन जाधव, उपसभापती श्रीशैल नरोळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी सभापती अशोक देवकते, बक्षी हिप्परगा माजी सरपंच विश्रांत गायकवाड यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केलेले बडे नेते ठाण मांडून होते.
परंतु शेवटच्या क्षणी दिवसभराच्या वेटिंग नंतर श्रीशैल नरोळे यांचा पॅनल मध्ये समावेश झाल्याचे पाहायला मिळाले. सिद्धाराम चाकोते, अशोक देवकते, हरीश पाटील यांच्या पदरी निराशा आली. राजशेखर शिवदारे हे सुद्धा पॅनल मध्ये सहभागी झाले आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे, बोरामणीचे रवी रोकडे, माजी सभापती इंदुमती अलगोंडा, केदार विभुते त्यांच्या पत्नी अनिता विभुते, सुनील कळके, सुभाष पाटोळे, उदय पाटील, संगमेश बगले, प्रथमेश वसंत पाटील, नागन्ना बनसोडे यांना मात्र लॉटरी लागली आहे त्यांचा पॅनल मध्ये समावेश झाला आहे.
हे आहेत श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे 15 उमेदवार
दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे, प्रथमेश वसंत पाटील, सुनील कळके, रवी रोकडे, इंदुमती अलगोंडा, अविनाश मार्तंडे, गणेश वानकर, सुभाष पाटोळे, उदय पाटील, संगमेश बगले, अनिता विभुते, नागण्णा बनसोडे,