मला सिद्धेश्वरांचा आशीर्वाद ! पत्रकारांच्या राजकीय गुगली प्रश्नावर पालकमंत्री जयकुमार गोरे असे का म्हणाले
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री जयकुमार गोरे हे असे पहिलेच पालकमंत्री असतील की ज्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सोलापुरातील सर्वच माध्यम प्रतिनिधींसोबत चहापान घेतले. मनमोकळ्या गप्पा मारल्या. सोलापूर शहराच्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करताना आश्र्वासित केले.
गोरे यांच्यापूर्वी सोलापूरचे पालकमंत्री पदावर राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील यांनी कामकाज पाहिले. या दोन्ही नेत्यांच्या पहिल्या दौऱ्यात ज्येष्ठ आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख कधीच दिसले नाहीत पण गोरे यांच्या पहिल्याच सोलापूर भेटीत विजयमालक आवर्जून उपस्थित होते, त्यांना गोरे यांनी त्याच पद्धतीने आदरयुक्त सन्मान दिला.
दरम्यान आज प्रजासत्ताक दिनी पत्रकारांशी गप्पा मारताना पत्रकारांनी विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता सोलापूरला विखे पाटील, चंद्रकांत दादा हे आले अन् गेले पण तुम्ही असा काय चमत्कार केला की, सिद्धलीला प्राप्त झाली आणि न दिसणारे नेते ही दौऱ्यात दिसले.
या राजकीय गुगली प्रश्नावर हजरजबाबी जयकुमारांनी अहो मला सोलापूरच्या सिध्देश्वरांचा आशीर्वाद आहे असे उत्तर येताच उपस्थित पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.