मी पुन्हा आलो…, मी पुन्हा आलो..माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके हजर ; एकीकडे जॉईन दुसरीकडे स्वागत
सोलापूर : 2014 ते 2019 दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे 2019 च्या इलेक्शन मध्ये मी पुन्हा येईन मी पुन्हा येईल हे वाक्य अधिकच गाजले. त्याची चर्चा झाली, टिंगल उडवली गेली. आता याच वाक्याला साजेशे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये घडले आहे. वारंवार तब्येतीचा कारण सांगून रजेवर जाणाऱ्या आणि स्वेच्छा निवृत्ती चा अर्ज दिलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके हे पुन्हा एकदा आपल्या पदावर हजर झाले आहेत. मंगळवारी प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडून फडके यांनी आपला पदभार घेतला.
माध्यमिक शाळांच्या टप्पा अनुदानातील शालार्थ आयडीचे कामकाज सुरू असताना नव्याने पदभार घेतलेले माध्यमिक शिक्षण अधिकारी मारुती फडके प्रकृती अस्वास्थ्यामुळे तीन महिन्यापूर्वी प्रदीर्घ रजेवर गेले होते त्यामुळे माध्यमिक चा पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला होता.
तब्येत ठीक झाल्यानंतर फडके यांनी पदावर हजर राहण्याची तयारी दाखवली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी प्रदीर्घ रजा असल्याने त्यांना वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र आणण्याबाबत सूचित केले शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय मंडळासमोर हजर राहून फडके यांनी मंगळवारी वैद्यकीय प्रमाणपत्र हजर केल्यानंतर प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी त्यांना हजर करून घेतले आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर प्रलंबित राहिलेले माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक प्रश्न आता सुटण्यास मदत होणार असल्याने शिक्षक संघटनाने सुटकेचा श्वास घेतला आहे.
इकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी मंगळवारी घेतला. सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्य प्रा. शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष म.ज. मोरे, जिल्हा संघाचे बब्रुवाहन काशिद, जिल्हाध्यक्ष अनिरूध्द पवार, जिल्हा सरचिटणीस सुर्यकांत हत्तूरे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रणजीत थीटे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रमोद कुसेकर उपस्थित होते.