सचिन कल्याणशेट्टी यांना सर्वाधिकार? ; बाजार समितीचे नूतन संचालक भेटले मुख्यमंत्र्यांना
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची निवड येत्या रविवारी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विजय झालेल्या पॅनल मधील माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, माजी सभापती राजशेखर शिवदारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
फडणवीस हे बुके स्वीकारत नाहीत त्यामुळे सर्वांनी आपल्या हातात गुलाब पुष्प घेऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.
बाजार समितीचा चेअरमन कोण? अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून रंगली आहे. माजी आमदार दिलीप माने यांचे नाव आघाडीवर असून सुरेश हसापूरे यांचे हे नाव समोर येत आहे. पण सचिन कल्याणशेट्टी यांच्या मनातील चेअरमन कोण असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, व आमदार कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मी तुमच्यासोबत आहे तुम्ही सर्वजण मिळून काम करा, सभापतीचा निर्णय ही समन्वयाने घ्या असे सांगितले असल्याची माहिती मिळाली.
या भेटीनंतर अधिक माहिती मिळाली की, रविवारी होणाऱ्या बाजार समितीच्या चेअरमन पदाचे नाव देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच जाहीर होणार आहे. दरम्यान आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एकत्रित राहून काम करा, मी तुमच्या कायम सोबत राहील अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.