रामदास आठवले यांच्याकडून शरद पवारांच्या ‘तुतारी’ची व प्रकाश आंबेडकरांच्या ‘वंचित’ची चारोळीतून खिल्ली; नंतर घेतले सावरून
सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नव्या चिन्ह मिळालेल्या तुतारीची आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित पक्षाची चारोळी तून चांगलीच खिल्ली उडवली.
शरद पवार यांना नुकतेच तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. त्यावर कविता करताना ते म्हणाले “शरद पवारांना मिळाली तुतारी, बघुया गावागावात किती ऐकणार आहे म्हातारी” अशी खिल्ली उडविली मात्र नंतर त्यांनी शरद पवारांनी बद्दल आदर व्यक्त करत त्यांना त्यांचे आमदार सांभाळता आले नाहीत, उलट त्यांनी एनडीए सोबत यायला हवे होते, यापूर्वी त्यांनी पुलोदचे सरकार जनसंघाला सोबत घेऊनच बनवले होते.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या ही पक्षाची चांगलीच खिल्ली आठवले यांनी यावेळी उडवली. सध्या महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना घेण्यावरून बराच गोंधळ सुरू आहे त्यावर बोलताना ते म्हणाले, “वंचित आघाडीचे तळ्यात कि मळ्यात बघूया आता जातात कुणाच्या गळ्यात” अशी चारोळी करत प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो त्यांनी महाविकास आघाडीला बाराचा दिलेला फॉर्मुला योग्य आहे परंतु जर महाविकास आघाडीमध्ये त्यांना घेतलं जात नसेल तर त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी असा सल्लाही आठवले यांनी दिला.