प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यक्रमाकडे सर्वच लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ ; नवे सीईओ कुलदीप जंगम यांनीच कार्यक्रमाची वाढवली शान
सोलापूर : प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार गुरुवारी चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. शिक्षक दिनाचा आजपर्यंतचे सर्वच कार्यक्रम हे पालकमंत्री, विविध आमदार, खासदारांच्या उपस्थितीत झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.
यंदाचा पहिलाच असा कार्यक्रम होता की त्या कार्यक्रमाला एकही लोकप्रतिनिधी हजर नव्हता. यावरून प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय शिक्षक आणि माध्यमांना आला.
या कार्यक्रमात प्रसिद्धी करण्यात सुद्धा कादर शेख हे कमी पडले. उद्या कार्यक्रम आणि आज सगळ्यांना निमंत्रण देण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांना बुधवारी नियोजन पत्रिका दिली गेली. यामध्येच यांचे फसलेले नियोजन दिसून येते.
शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात येतो हा पुरस्कार पालकमंत्री, ज्येष्ठ खासदार किंवा जेष्ठ आमदार यांच्या हस्ते जर मिळाला तर त्याला अधिक महत्त्व प्राप्त होते. पण आज शिक्षकांचा हिरमोड झाला.
शेवटी नवीनच जॉईन झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी हा कार्यक्रम स्वतः हँडल करत या कार्यक्रमात स्वतःची वेगळी छाप सोडली. त्यांनी उपस्थिती शिक्षकांमध्ये चैतन्य वाढवले.
आपल्या भाषणामध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेल्या आणि पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले. यापुढे जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासह विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. माझे आई-वडील स्वतः शिक्षक होते. त्यामुळे शिक्षकाची जबाबदारी त्याचे कर्तव्य मला लहानपणापासून माहित आहेत. म्हणून मला शिक्षकांबद्दल अतिशय आदर असल्याचे ते म्हणाले.