सोलापूर : सोलापूर येथील गुरुनानक चौकामध्ये सुरु होत असलेल्या १०० बेडेड महिला हॉस्पिटल व १०० बेडेड जनरल हॉस्पिटलचे काम अद्यापही अपूर्ण् अवस्थेत आहे. या हॉस्पिटलमध्ये फर्निचरची निविदा प्रलंबित असून ते काम पूर्ण होण्यास अद्याप सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
असे असताना आरोग्य विभागाने राजकीय दबावतंत्रातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या हॉस्पिटलचा ताबा घेतलेला आहे. त्याचे कारण येणारी लोकसभा निवडणूक डोळयासमोर ठेवून सत्ताधारी पक्ष या हॉस्पिटलचे काम अर्धवट असतानासुध्दा या हॉस्पिटलला खाजगी कंपनीस चालवण्यास देऊन उद्घाटन करण्याची तयारी करत आहे.
या हॉस्पिटलमध्ये नोकर भरती करण्याकरिता खाजगी कंपनीस कंत्राट देण्यात आलेले आहे. या कंपनीव्दारे BAMS डॉक्टर, ANM, GNM नर्सेस, वॉर्ड बॉय, मामा-मावशी, टेक्निशियन व सफाई कामगार यांची भरती करण्यात येणार आहे. या कर्मचा-यांची भरती करताना कोणतीही परीक्षा न घेता सत्ताधा-यांच्या वशील्याने नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत अशा उमेदवारांना सरकारी नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे.
तसेच अशा नोकर भरतीत कोणतेही आकृतीबंध व बिंदूनामावलीची अट नसल्याकारणामुळे मागासवर्गीय (SC/ST) व ओबीसी (OBC) आरक्षणास पात्र असलेल्या उमेदवारांना हया नोकरभरतीपासून वंचित राहावे लागणार असल्यामुळे त्यांच्यावर मोठया प्रमाणात अन्याय होणार आहे. तसेच या हॉस्पिटलचे खाजगीकरण झाल्यास या रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येणा-या सर्वसामान्य नागरिकांना आपल्या औषधोपचारासाठी अवाढव्य शुल्क भरावे लागणार असून त्यांची मोठया प्रमाणात पिळवणूक होणार आहे.
त्यामुळे ही कर्मचारी भरतीसाठी खाजगी कंपनीला दिलेले कंत्राट तात्काळ रद्द करुन ही कर्मचारी भरती सरकारी नियमांनूसार घेण्यात येवून बिंदूनामावली प्रमाणे नियुक्ती देण्यात यावी व या हॉस्पिटलचे कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरण करण्यात येऊ नये, तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आ. प्रणिती शिंदे यांनी दिला आहे.