सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा मधील होम हवन या विधीच्या दिवशी सात नंदी ध्वजाची मिरवणूक निघाली होती त्यावेळी बैलगाडीमध्ये श्री सिद्धेश्वर यांच्यासोबत महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा लावली होती काही वेळाने ही मिरवणूक पुढे आले असता महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा पेपरने झाकली गेली. होम मैदानाजवळ ही मिरवणूक आली असता त्यावेळी तर महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा काढून टाकण्यात आली असल्याचे पाहायला मिळाले. या सर्व घटनेचे फोटो सोलापूरच्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि त्याचा लिंगायत समाजातून तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात येत आहे.
लिंगायत समाजाचे नेते विजयकुमार हत्तुरे यांनी या घटनेबाबत निषेध करताना तुम्हाला श्रीराम चालतो तर महात्मा बसवेश्वर का नाही? असा सवाल केला असून नंदी ध्वज मिरवणुकीमध्ये विजयकुमार देशमुख यांच्या नंदीध्वजाला या मिरवणुकीत श्रीरामाची प्रतिमा लावली होती. हतुरे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र देऊन या वृत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बसवारुड मठाधिपती शिवपुत्र आप्पाजी महाराज यांनी पोस्ट टाकून या वृत्तीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
बा, सिद्धरामा आम्हाला माफ करा… आमच्या क्षुद्र बुद्धीवर दया करा…हे करूणाघना आमच्या अज्ञानावर संक्रात येऊ दे… ज्ञानाची किरणे पडू दे…
तुम्ही म्हणालात….
बसवण्णा हेच आई,
बसवण्णा हेच बाबा,
बसवण्णा हेच माझे सख्खे भाऊ पहा,
हे वसुधीश कपिलसिद्ध मल्लिकार्जुन देवा,
तुमचे आणि माझेही नामकरण करणारे
देव बसवण्णा आहेत..
शिवयोगी सिद्धरामेश्वरांची समग्र वचने , संपुट 4- वचन क्र. 809
———-
बसव गीत न गाणाऱ्या,
बसवण्णांचे गुणगान न करणाऱ्या,
बसव या तीन अक्षरी मंत्राचा जप न करणाऱ्या
दसगेडी माणसाचे तोंड मला दाखवू नका देवा कपिलसिद्ध मल्लिकार्जुना
शिवयोगी सिद्धरामेश्वरांची समग्र वचने , संपुट 4- वचन क्र. 811
….
आता तुमचे भक्त म्हणून तुम्हाला तोंड दाखवायची लाज वाटते आम्हाला…आमच्या अहंकारामुळे तुम्हालाच ‘छोटे’ करतोय याचे भान आम्ही हरवून बसलोय.