काका साठे निवडणुकीतून माघार घेणार? सुभाष देशमुखांना बिनशर्त पाठिंबा देणार
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एका राजकीय वळणावर येऊन पोहोचली आहे या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप असा पिक आहे एकीकडे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दिलीप माने, सुरेश हसापुरे, नरोळे, शेळके, शिवदारे, पवार हि नेते मंडळी निवडणूक लढवत आहे. परंतु ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांना ही युती मान्य नाही. ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र पॅनल उभा करण्यासाठी तयारी करत आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नेते काका साठे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे परंतु सचिन कल्याणशेट्टी यांच्या युतीमध्ये काका साठे यांचा समावेश दिसला नाही त्यामुळे काका काहीसे नाराज दिसून आले. काका साठे यांच्या विकास सोसायटी नसल्या तरी उत्तर तालुक्यात ग्रामपंचायत मध्ये त्यांना मानणारे मतदान आहे तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्यांना मानणारा वर्ग आहे पण काका साठे हे स्वतः या निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः पत्रकारांना दिली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील त्यांच्यासोबतच काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सुभाष देशमुख यांनी जर पॅनल तयार केला तर उत्तर तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी काका साठे हे देशमुख यांना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
2017 च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये भाजपचे त्यावेळचे सरकार मंत्री सुभाष देशमुख आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची युती झाली होती आणि या युतीमुळे पंचायत समितीवर भाजपचा सभापती झाला होता. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा सुभाष देशमुख व काका साठे एकत्र आले तर नवल वाटायला नको.