जोडी नंबर वन : “समाधान आवताडे है तो सेफ है” ! मंगळवेढ्याला मिळाला दुसऱ्यांदा हक्काचा आमदार
सोलापूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा दुसऱ्यांदा दहा हजार मतांच्या फरकाने पराभव केला. महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढला त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेर भाजपला समाधान मिळाले.
सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला सुमारे 40 हजार हून अधिक मताधिक्य गेले होते त्यामुळे या ठिकाणी भाजप बॅक फुटवर गेला. 2021 मध्ये पोट निवडणुकीत विजय झाल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली.
सुरुवातीला माजी आमदार प्रशांत परिचारक हे सुद्धा नाराज होते परंतु त्यांची नाराजी घालवण्यात भाजप यशस्वी झाले आणि त्याचा निश्चितच फायदा समाधान आवताडे यांना या निवडणुकीत झाला. मागील तीन वर्षात समाधान आवताडे यांनी या मतदारसंघात केलेली विकास कामे, प्रत्येक गावोगावी दिलेला मोठ्या प्रमाणात निधी तसेच मंगळवेढ्यातील चाळीस गावच्या पाणी प्रश्नाचा विषय भारतीय जनता पार्टीने मार्गी लावण्यात यश मिळवले. त्याचाही या निवडणुकीत आवताडे यांना फायदा झाल्याचे दिसून येते. तसेच समाधान आवताडे यांचा मितभाषी स्वभाव, सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका दुसऱ्यांदा त्यांना आमदार करण्यात महत्वाची ठरली आहे.
याउलट महाविकास आघाडी मध्ये झालेली बिघाडी ही काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली. सुरुवातीला भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. त्यांना पवारांनी ग्रीन सिग्नल दिला परंतु दुसरीकडे प्रणिती शिंदे यांनी भालके यांना उमेदवारी जाहीर केली आणि ए बी फॉर्म दिला. त्यांची अडचण झाली. विक्रम सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्यांनी फॉर्म भरला. त्यामुळे या मतदारसंघातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा फायदा भाजपच्या आवताडे यांनी उचलला. जितक्या मताने भगीरथ भालके पडले तेवढेच मते राष्ट्रवादीच्या सावंत यांनी घेतली आहेत.
पण या निवडणुकीत भगीरथ भालके यांच्या पाठीशी जनाधार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.