उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने साडेतीन लाख कोटींची गुंतवणूक ; 1 लाख रोजगार निर्मिती
राज्यात हरित हायड्रोजन प्रकल्पांच्या माध्यमातून २ लाख ७६ हजार ३०० कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक होणार असून याअनुषंगाने सात प्रकल्पांसाठी आज विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले.
‘सह्याद्री’ अतिथिगृह येथे आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासन आणि हायड्रोजन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या विकसकांमध्ये हे सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, ‘महाऊर्जा’च्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ” हरित हायड्रोजनसंदर्भात प्रभावशाली धोरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. पंतप्रधान मोदी यांनी २०३० पर्यंत डीकार्बनाईज करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार वाटचाल सुरू आहे. हरित हायड्रोजनमुळे पर्यावरणाचा समतोल राखून ऊर्जानिर्मिती करणे शक्य होणार आहे. राज्य सरकारने जे धोरण तयार केले आहे त्यात सर्वांनी आवश्यक ते बदल सुचवावेत. महाराष्ट्र हरित हायड्रोजन क्षेत्रात पथदर्शी राज्य बनावे त्यासाठी आज झालेले सामंजस्य करार यशस्वीरीत्या कार्यान्वित होतील.”