सोलापुरात काँग्रेसचा ‘सुशील’ सांगणार ‘शहर उत्तर’वर दावेदारी
सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांच्या विजयानंतर सोलापुरातील शहरी भागात असणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसच्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. आज पर्यंत दक्षिण सोलापूर, शहर मध्य या दोन मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक कार्यकर्ते दिसून आले आहेत परंतु मागील काही दिवसात शहर उत्तर या मतदारसंघातून ही ती संख्या वाढताना दिसत आहे.
शहर उत्तरमधून आजपर्यंत राजन कामत, सुनील रसाळे, प्रकाश वाले, उदय चाकोते यांनी पक्षाकडे उमेदवारी मागणी केली आहे. आता यामध्ये युवा नेते सीए सुशील बंदपट्टे यांचा ही समावेश झाला असून शहर उत्तर वर आता सुशील सुद्धा आपली दावेदारी सांगणार आहेत.
मागील काही दिवसांपासून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शहर उत्तर पक्षाकडे सुटावा म्हणून जोर लावण्यात येत आहे. यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले होते पण आता काँग्रेसला चांगले दिवस आहेत म्हणून पक्षाने उत्तर सोडून घ्यावे यासाठी दबाव वाढल्याचे पाहायला मिळाले.
शहर उत्तरची चाचपणी केली असता काँग्रेसकडून सुनील रसाळे, राजन कामत, सुदीप चाकोते, यांच्यानंतर वडार समाजातील सुशिक्षित चेहरा म्हणून सुशील बंदपट्टे यांची नावे समोर आली होती.
पक्षाची ज्येष्ठ नावे असताना आणि महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता असल्याने सुशील बंदपट्टे यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली नव्हती परंतु पक्षाकडे उत्तर ची जागा काँग्रेसला सुटण्यासाठी जेव्हा जोर वाढला तेव्हा बंदपट्टे यांनीही युवा चेहरा म्हणून आपली दावेदारी सांगितली आहे.
वडार समाजातील सुशिक्षित चेहरा म्हणून बंदपट्टे यांच्याकडे पाहिले जाते. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे मोठे संघटन आपल्या भागात बांधले आहे. महिलांसाठी असणाऱ्या योजना आणि त्या संदर्भात कामकाजासाठी दिवसभर आपले कार्यालय त्यांनी सुरू ठेवले आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वडार समाजाला एकत्रित करण्यात सुशील बंदपट्टे यांचा वाटा पाहायला मिळाला आहे.