सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा
सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद
महाविद्यालयाचे प्राचार्यांनी जवळपास १२ लाख रुपयांची संस्थेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी १६ वर्षांनंतर दाखल फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात उभयतांविरुध्द गुन्हा दाखल झाला. दिपक शंकरराव आहेरकर आणि प्रदीप सतीश नांदगावकर अशी आरोपींची नांव आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापुरातील सखाराम नेमचंद जैन औषधालय ट्रस्टचे मानद सचिव दिपक शंकरराव आहेरकर आणि शेठ गोवींदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप सतीश नांदगावकर यांनी संगनमताने संस्थेचे ठराव नसताना बनावट ठराव दस्त तयार करून तो दि रत्नाकर बँक, लि. या बँकेत खरा आहे म्हणून मुदतपूर्व एफ डी मोडून त्यातील ३,९२,९३५ रूपये काढून घेतले. हा प्रकार २००५ ते २००९ दरम्यान गोवींदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयात घडला.
तसेच कर्जाची आवश्यकता नसताना ट्रस्टमधील विश्वस्तांना माहिती न देता रत्नाकर बँकेतील २४,००,००० रूपयांची एफ. डी. वर तारण ठेऊन त्यावर ८,००,००० रूपयांचं कर्ज काढले. उभयतांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ११,९२,९३५ रूपये वापरून संस्थेची फसवणूक केली.
हा प्रकार निदर्शनास आल्यावर अरविंद रावजी दोशी (रा-१७, सोनी कॉलेजसमोर, प्रतापनगर रोड, सोरेगांव) यांनी शुक्रवारी मध्यरात्री फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दिपक शंकरराव आहेरकर (रा-५ पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर) आणि प्रदीप सतीश नांदगावकर, (रा-७०/३ पन्नालाल नगर, अमरावती) यांच्याविरुद्ध भादवि ४२०,४६७,४३८,४७१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.