सोलापुरात पॉलिटिकल रंगपंचमी ! ताई -भाऊंनी खेळले असे रंग ; विजयाचा रंग सुद्धा ठरला
सोलापूर : ज्या प्रमाणे सोलापूरचे तापमान वाढत आहे त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत चुरस ही वाढू लागली आहे. शनिवारी सोलापुरात रंगपंचमी साजरी झाली. लोकसभेच्या दोन्ही आमदार उमेदवारांनी रंगपंचमी खेळत विजयाचा रंग ही ठरवले आहेत.
महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या रंगपंचमीच्या दिवशी सकाळीच अक्कलकोट दौऱ्यावर गेल्या. त्या ठिकाणी बंजारा समाजाच्या महिलांनी त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करत त्यांच्यावर गुलाब पुष्पांचा वर्षाव केला आणि यावेळी प्रणिती शिंदे यांनी त्या महिलांसोबत रंग खेळले.
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ व वाढत चाललेली पाणीटंचाई यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना सुचित करून ही रंगपंचमी बिनपाण्याची खेळण्याचे आवाहन केले होते. त्या पद्धतीने युवक काँग्रेसच्या वतीने कोरडे रंग खेळून भाजप सरकार शहरात पाणी देत नसल्याने त्यांचा निषेध नोंदवण्यात आला. चार जून रोजी विजयाची रंगपंचमी आम्हीच खेळणार असा दावा युवा काँग्रेसने केला.
दुसरीकडे भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी सोलापूर शहरात चंद्रकांत वानकर यांच्या वतीने आयोजित केलेल्या रंगपंचमी उत्सवात येऊन रंग खेळले. त्या ठिकाणी त्यांचेही भाजप कार्यकर्त्यांनी अतिशय जोरदार स्वागत केले.
यावेळी माध्यमाची बोलताना राम सातपुते यांनी येणाऱ्या चार जून रोजी विजयाचा भगवा गुलाल आम्ही उधळणार असा दावा करून काँग्रेसला एक प्रकारे आव्हान दिले.
त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात पॉलिटिकल रंगपंचमी रंगल्याचे पाहायला मिळाले. एकमेकांच्या विरोधात उभे असलेले आमदार भाऊ आणि आमदार ताईं हे सुद्धा या रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन निघाले.