देशमुखांच्या त्या आदेश पत्राने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात अ’संतोष’ ; “अरे मोहना जीव तुझा इथे गुंतला”!

सोलापूर : राज्याच्या सहकार पणन विभागाने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक प्रक्रियेला स्थगिती देणारा आदेश काढला. उपसचिव संतोष देशमुख यांच्या त्या आदेश पत्रानंतर राजकीय वर्तुळात असंतोष पहायला मिळत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच सुरू झाली होती पण त्या निवडणुकीला आहे त्या स्टेजवरून 31 डिसेंबर 2024 पर्यंत स्थगिती देण्यात आली होती.
त्यानुसार एक जानेवारी 2025 पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल म्हणून बाजार समिती निवडणुकीच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या. माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी बैठका घेतल्या. दुसरीकडे दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्याही गुप्त बैठका घेतल्या. बाजार समिती निवडणुकीच्या मतदार यादीला सहा महिने पूर्ण झाल्याने नव्याने मतदार यादी करावी या मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने फेटाळले होते त्यामुळे एक 1 जानेवारी नंतर निवडणूक लागेल अशी शक्यता होती.
परंतु एक ते डिसेंबर 2024 रोजी राज्याच्या सहकार पणन विभागाने पण उपसंचालक यांच्या आदेशानुसार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे त्या स्टेज पासून स्थगिती देण्यात येत असून नव्याने प्रारूप मतदार यादी करण्याचे आदेश उपसचिव संतोष देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधक आणि सचिव बाजार समिती सोलापूर यांना केले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला.
या पत्रानंतर काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांच्या समर्थकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांना निवडणुकी संदर्भात आदेश काढण्याचे अधिकार असताना पणन उपसंचालक यांनी बेकायदेशीर आदेश केले आहेत त्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगण्यात आले. निवडणूक प्राधिकरण असताना उपसंचालक यांना निवडणुकी संदर्भात निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही.
सोलापूर बाजार समितीचे सचिव तथा प्रशासक मोहन निंबाळकर आणि पणन उपसंचालक यांची मिली भगत असून मार्च 2025 पर्यंत बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलायची अन् बाजार समितीतील मलिदा मारायचा हा डाव असल्याचा आरोप हसापुरे समर्थकांनी केला आहे. यामध्ये राज्याच्या माजी सहकार मंत्र्यांचाही हात असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत.