सोलापुरात काँग्रेसच्या बॅनरला अपक्ष उमेदवाराच्या या बॅनरने उत्तर ; पोस्टरचा राजकीय वॉर
सोलापूर : ‘वडिलांनी मागच्या ४० वर्षांत सोलापूरसाठी काहीही केलं नाही. त्यांची लेक काय करणार ?’ असा मजकूर असलेले बॅनर शहरात झळकत आहेत. सोलापूर लोकसभा निवडणुकीमधील अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी शहरात हे बॅनर लावले आहेत.
लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. सर्व उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आपल्या पक्षाचा तसेच अपक्ष उमेदवारांनी स्वतःचा प्रचार केला आहे. सोलापूरचा विकास करण्याची हमी देत उमेदवारांनी आपल्याला मतदान करावे असे आवाहन सोलापूरकर मतदारांना केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे सोलापूरच्या विकासाची चर्चा होत असतानाच रविवारी सकाळी अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी ‘वडिलांनी मागच्या ४० वर्षांत सोलापूरसाठी काहीही केलं नाही. त्यांची लेक काय करणार ?’ अशा मजकुराचे बॅनर संपूर्ण शहरभरात लावून राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे.
या बॅनरच्या माध्यमातून सचिन मस्के यांनी अप्रत्यक्षपणे सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. उमेदवार सचिन मस्के यांनी बॅनरच्या माध्यमातून आपली भूमिका सोलापूरकरांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरभर झळकणाऱ्या या बॅनरची चर्चा सध्या सर्वत्र जोरदार सुरू आहे. नागरिक या बॅनरचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा विविध समाज माध्यमांवर या बॅनरची चर्चा सुरू आहे.