मंत्रालयाला ही लाजवेल असे जयकुमार गोरे यांचे सोलापुरात कार्यालय ; बसायला थेट सिंहासन !
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वेगळाच रुबाब आहे. त्यांनी केवळ सहा महिन्यातच आपली वेगळी छाप सोलापूरकरांवर पाडली आहे. प्रशासनावर सुद्धा त्यांनी दबदबा निर्माण केला आहे.
नवा पालकमंत्री नवे कार्यालय असे काहीच चित्र मागील काही दिवसात सोलापुरात पाहायला मिळत आहे. यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री असताना त्यांनी आपले कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी केले होते. चंद्रकांत पाटलांनी मात्र कोणतेही बदल केले नाहीत.
आता जयकुमार गोरे यांनी आपले कार्यालय जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी केले असून ते कार्यालय सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
केवळ वीस ते पंचवीस दिवसांमध्ये जिल्हा नियोजन अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हे दिमागदार कार्यालय तयार केले आहे. एकूण कार्यालय आणि आतील फर्निचर, खुर्च्या, सोफे, फिनिशिंग पाहता मंत्रालयाला लाजवेल असे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे कार्यालय दिसून येत आहे.


शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोरे यांच्याच हस्ते या कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. अँटी चेंबरमध्ये त्यांना बसण्यासाठी सिंहासन पद्धतीची खुर्ची ठेवण्यात आली आहे ती सुद्धा सर्वांचे लक्ष वेधते.