दक्षिण सोलापूरमध्ये सोमेश वैद्य यांनी घातले शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष ; मोर्चेबांधणी जोरात
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना भीमा दोन्ही नद्यांवर आवश्यक त्या ठिकाणी बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या शेतीला 24 तास पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी मला साथ द्यावी. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी ग्वाही स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ (सोमेश) वैद्य यांनी दिली.
औराद येथे श्रावण महिन्यातील दुसऱ्या श्रावण सोमवारी यंदाही यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ वैद्य यांच्या तर्फे भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी औराद ग्रामस्थांकडून औराद विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाबुराव पाटील यांच्या हस्ते ऍड. वैद्य यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
ॲड. सोमनाथ वैद्य पुढे म्हणाले, औराद सारख्या मोठ्या गावातील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन, श्री सिद्धनाथ,, श्री बिसलसिद्ध, श्री मलकारसिद्ध देवतांच्या पालखींची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये मला सहभागी होता आले. असेच प्रेम गावकऱ्यांचे माझ्यावर राहावे. भविष्यात कुठल्याही प्रकारच्या अडचण असल्यास तत्काळ माझ्याशी संपर्क साधावे. त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना व भीमा या दोन नद्या वाहत असून दक्षिण तालुका निसर्गसंपन्न तालुका आहे. तालुक्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये धवल क्रांती होणे गरजेचे आहे. त्यासाठी मी कटिबद्ध आहे.
प्रास्ताविकात माजी मुख्याध्यापक संगण्णा पाटील यांनी महाप्रसादाची व्यवस्था केल्याबद्दल त्यांचे स्वागत केले. दक्षिण सोलापूर तालुक्यात अल्पावधीतच गरुड झेप घेतलेल्या सोमनाथ वैद्य यांच्या कामाचे कौतुक केले. सर्वदानामध्ये अन्नदान हे श्रेष्ठ असून ते महत्त्वाचे काम सोमनाथ वैद्य करत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष लिंगराज पाटील, श्रीमंत पाटील, श्याम तेली, संजवाडचे पाराप्पा बिराजदार, सरपंच शशिकांत बिराजदार, माजी सरपंच यल्लाप्पा कोळी, रायगोंडा पाटील, सिद्धाराम गुरव, दयानंद टेळे, दयानंद स्वामी, सिद्धरामय्या मठपती, सुरेश शेंडगे, संगया स्वामी, सिद्धाराम लोहार, श्रीशैल तेली यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला सुवासिनींची लक्षणीय उपस्थिती
ग्रामदैवत मल्लिकार्जुन श्रावण सोमवार (हेडगी ) यात्रेनिमित्त महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्व महिला भगिनींच्या डोक्यावर आकर्षक रित्या दासोह घेऊन यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या. सीना नदीतील जलपूजन सुहासिनींच्या हस्ते करण्यात आले.