राजेश काळेंच्या दावेदारीमुळे भाजप मध्ये खळबळ ; दक्षिणमध्ये बापूंचे टेन्शन वाढणार
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर सोलापुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आमदारकी साठी दावेदारी वाढली असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षामध्ये ही इच्छुकांची संख्या वाढली आहे.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या दहा हजाराच्या मताधिक्यामुळे आता विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्याही उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता भारतीय जनता पार्टी कडून आदिवासी पारधी समाजातील माजी उपमहापौर राजेश काळे यांनीही दावा सांगितल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर एका आदिवासी महिलेला देशाच्या राष्ट्रपती करत असतील तर महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस हे राजेश काळे यांना आमदार का करू शकत नाहीत असा प्रश्न काळे यांचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण विधानसभा मतदारसंघात जो शहरी भाग येतो त्यामध्ये राजेश काळे यांच्या प्रभागात भाजप उमेदवार राम सातपुते यांना चार हजाराचे मताधिक्य दिले आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात ग्रामीण पेक्षा शहरी भागाचे सर्वाधिक मतदान आहे या भागामध्ये असलेल्या नागरिकांमध्ये राजेश काळे यांच्या बाबत नागरिकांच्या चांगले मत असल्याचे बोलले जाते.
कोण आहेत राजेश काळे?
राज्यातील आदिवासी पारधी समाजाचे नेते, समाजाच्या अनेक प्रश्नांवर यशस्वी आंदोलन, समाजामध्ये सुशिक्षित व आधुनिक विचारसरणीचा कार्यकर्ता, सोलापूर महानगरपालिकेचे आदिवासी पारधी समाजातील पहिले उपमहापौर, नागरी समस्या बाबत प्रशासनाशी भिडताना त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.