आ. सचिन कल्याणशेट्टींच्या हस्ते कासेगावात 10 कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ ; श्रीकांत वाडकर यांच्या 65 व्या जयंतीनिमित्त उत्स्फूर्त रक्तदान
कासेगावचे लोकप्रिय माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य लोकरत्न कै. श्रीकांत (बप्पा) वाडकर यांच्या 65 व्या जयंतीचे औचित्य साधून कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. गावात अनेक ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व लोकरत्न कै. श्रीकांत बाप्पा वाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या कासेगाव व पंचक्रोशीतील अनेक गावातून आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी आपल्या मनोगतात कासेगावसाठी दिलेल्या भरघोस निधीबद्दल आमदारांचे आभार मानले व आगामी विकास कामांसाठी मागण्यांचे निवेदन केले. सत्काराला उत्तर देताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कासेगावकडे विशेष लक्ष देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
रस्ते, इमारती, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, सिंचन आदी विविध विभागाच्या मिळून तब्बल 10 कोटी रुपयांच्या कामांचे उदघाटन यावेळी करण्यात आले. तसेच आगामी निविदाप्रक्रियेत असणाऱ्या 20 कोटी रुपयांच्या कामांची घोषणा करण्यात आली. आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव यांनी तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी केले.
व्यसपीठावर सिद्धाराम हेले, श्रीमंत हक्के, मधुकर चिवरे, सिताराम कदम, नेताजी खंडागळे, बालाजी कवडे, प्रशांत जाधव, आबा भागवत, भारत चीवरे, मनोज गुंड, वैभव हलसगे, दत्तात्रय खंडागळे, बब्रुवान खंडागळे, ज्ञानेश्वर रोकडे, राजाराम चौगुले, नेताजी पाटील, मल्लिनाथ येणगुरे, लक्ष्मण वाडकर, संभाजी चौगुले, प्रकाश हेडे, जालिंदर गायकवाड, शाहाजन शेख, नारायण जाधव, केदार ढेकळे, राजश्री येणगुरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कासेगाव व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी लहुजी शक्ती चौक येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन लेबर फेडरेशनचे अध्यक्ष श्री शंकर चौगुले यांनी केले. दिलीप चौगुले, असलम तांबोळी, निशिकांत पाटील, सरकार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 76 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य पार पाडले.