मला हा चार्ज नको रे बाबा ! सोलापूर झेडपीच्या समाज कल्याणवर दुसऱ्यांदा पाटीलकी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी हे पद जिल्हा परिषदेला धार्जिन नाही असे चित्र मागील बऱ्याच वर्षापासून पाहायला मिळते. आलेला समाजकल्याण अधिकारी एक ते दीड वर्षाच्या वर राहत नाही एक तर त्याची बदली होते अन्यथा तो अधिकारी विनंती बदली करून जातो. किंवा तो सस्पेंड होतो.
मागील सात वर्षांमध्ये सहा समाज कल्याण अधिकारी बदललेले आहेत त्यामध्ये पाच वेळा तर अतिरिक्त पदभार दिला गेला आहे यापूर्वी समाजकल्याणचा अतिरिक्त पदभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे यांच्या नंतर उप मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांच्याकडे पदभार होता, नंतर तो पदभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी सांभाळला. समाज कल्याणचा पदभार असताना पाटील यांच्यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दलित वस्तीच्या टक्केवारीवरून ताशेरे ओढले गेले होते.
मागील वर्षभरापासून सुनील खमितकर यांच्याकडे जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी पदाचा पदभार पूर्ण वेळ होता परंतु त्यांच्या कामातील चुकारपणा यामुळे त्यांना शासनाने निलंबित केले त्यामुळे हे पद रिक्त होते, यापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सांभाळलेले जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पदभार दिला.
दरम्यान मिरकले हे मेडिकल रजेवर गेले होते, त्याच दरम्यान हा चार्ज सीईओ आव्हाळे यांनी सामान्य प्रशासनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या कडे दिला आहे. मिरकले हे रजेवरून येताच त्यांना पदभार हा पाटील यांच्या कडे दिल्याचे समजल्यावर त्यांनी लगेच पत्र देऊन समाज कल्याण अधिकारी पदाचा पदभार नको म्हणून सांगितले असल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली.
स्मिता पाटील यांच्या केबिन समोर आता वसतिगृह चालकांची गर्दी पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत चालणाऱ्या वसतिगृहाच्या बिलांचा विषय हा तर संशोधनाचा भाग आहे.