सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या दोन दिवसात सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे काँग्रेस नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सात रस्ता परिसरातील जनवात्सल्य या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा बुधवारी दौरा असून ते सकाळी साडे दहाच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत थेट हेलिकॉप्टरने कुंभारी येथील रे नगर या ठिकाणी येतील. सायंकाळी पाचच्या सुमारास काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी ते जाणार आहेत.
या भेटी मागील माहिती जाणून घेतली असता सोलापुरात होणाऱ्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पालकमंत्री पाटील हे सुशीलकुमार शिंदे यांना निमंत्रण देण्यासाठी जाणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष असून यापूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात साहित्य संमेलन नाट्य संमेलन यशस्वी करून दाखवले आहे त्यांचे योगदान पाहता आपण स्वतः त्यांच्या निवासस्थानी त्यांना निमंत्रण देण्यासाठी जाण्याचे नियोजन पालकमंत्र्यांनी केले असल्याचे समजले.
आगामी लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. भाजपच्या काही नेत्यांनी शिंदे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी यापूर्वी प्रयत्न केले असल्याचेही ऐकण्यास मिळते. याच पार्श्वभूमीवर जरी पालकमंत्री हे निमंत्रण देण्यासाठी जात असले तरी त्यांची ही भेट निश्चितच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणार हे मात्र नक्की.