सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी नऊच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला त्यानंतर पालकमंत्र्यांचा ताफा जिल्हा परिषदेकडे रवाना झाला.
जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री गोरे आमदार समाधान आवताडे आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अभिवादन केले.
त्यानंतर सर्व जिल्हा परिषदेत दाखल झाले. जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नूतनीकरण झाले आहे, त्याचे उद्घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सभागृहाची सर्व मान्यवरांनी पाहणी केली त्यावेळी एकूणच सभागृह पाहून पालकमंत्र्यांनी अतिशय सुंदर सभागृह असल्याची थाप दिली.
त्यानंतर हिरकणी कक्षाचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद मराठा सेवा संघाच्या वतीने पालकमंत्री गोरे यांचा अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी सत्कार केला.