सोलापूर : तरुणाची गाडी अडवून चौघांनी अपहरण केले, मोबाईलच्या क्यू आर कोड स्कॅन करून 20 हजार रुपये काढून घेतले, आणि दोन तासांनी परत आणून सोडले. ही घटना सोलापूर शहरात 23 डिसेंबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास जुना कारंबा नाका याठिकाणी घडली.
याप्रकरणी 25 डिसेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वेश शामसुंदर बाहेती, वय १९ वर्षे, रा. सम्राट चौक, श्री अपार्टमेंट, प्रभाकर महाराज मंदिर जवळ, सोलापूर असे अपहरण झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. फिर्यादी हा २३/१२/२०२३ रोजी सकाळी ०६.०० वा चे सुमारास, महेश सोसायटीचे मागील बाजुस, कारंबा नाका जवळ असताना अनोळखी चार इसमांनी फिर्यादीची एक्सीस मोटार सायकल अडवून जबरदस्तीने फिर्यादीस गाडीवर बसवून, पुणे रोडने घेवून गेले व फिर्यादीचे मोबाईल मधील २०,००० रुपये त्यांचे मोबाईलचे क्युआर कोडवर स्कॅन करुन घेतले व फिर्यादीचे वडीलांना फोन करुन पैशाची मागणी केली व नाही दिले तर ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी फिर्यादीचे वडीलांनी पैसे देतो म्हणाले. नंतर सकाळी ०८.३० वा चे सुमारास फिर्यादीस सोलापूर पुणे हायवे वरील मडके वस्ती येथील नेक्सा शोरुम येथे सोडुन ते चौघे आरोपी निघुन गेले. या प्रकरणाचा तपास सपोनि धायगुडे करीत आहेत.