दक्षिण मध्ये धर्मराज काडादी यांच्या सभेत शेतकऱ्यांचा गोंधळ ; ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक
सोलापूर : दक्षिण विधानसभा मतदारसंघात सिद्धेश्वर परिवाराचे नेते श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून ते सध्या गावोगाव फिरून चाचपणी करीत आहेत. त्यांच्यासोबत लिंगायत समाजाचे नेते फिरताना दिसतात.
परंतु अनेक गावात काडादी यांना सभे दरम्यान शेतकरी ऊस बिलाबाबत जाब विचारताना दिसत आहेत. तेलगाव, कूसुर या गावात शेतकऱ्यांनी काडादी यांच्या सभेमध्ये मोठा गोंधळ घातला. “आदी उसाचे बिल द्या मग नंतर बोला, उसाचे बिल देता येईना आणि चालले आमदार व्हायला” असे शब्द संतप्त शेतकरी आपल्या तोंडून काढताना दिसत आहेत.
सिद्धेश्वर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणी पाडल्यानंतर काडादी यांच्याबाबत दक्षिण, उत्तर, अक्कलकोट तालुक्यात सहानुभूती निर्माण झाली होती आणि लोकसभेत नंतर तयार झालेले वातावरण पाहता प्रथमच धर्मराज काडादी हे राजकीय व्यासपीठावर येऊन त्यांनी दक्षिण लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ते चाचपणी करीत आहेत परंतु त्यांना शेतकऱ्यांमधून तीव्र असा विरोध होत असून कुसूर या गावातून त्यांना सभा सोडून जावे लागल्याचा प्रसंग यांच्यावर आला.