सोलापुरात ड्रंक अँड ड्राईव्ह करू नका रे…! पोलीस थेट तोंडातच घालतात नळी
सोलापूर : पुण्यात दारू पिऊन गाडी चालवत एका बिल्डरच्या मुलाने दोन निष्पाप युवकांचा जीव घेतला. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे, नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
सोलापूर पोलीस आयुक्तालयाने रात्रीच्या सुमारास दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांच्या तपासण्या सुरू केल्या आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जुना कुंभारी नाका या ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रात्रीच्या सुमारास फिरणाऱ्या नागरिकांच्या गाड्या अडवून त्यांची तपासणी केली. पोलिसांकडे असलेल्या पोर्टेबल ब्रीथलायझरच्या माध्यमातून नागरिकांच्या तोंडामध्ये त्याची नळी घालून ती फुकायला लावली. त्यामुळे शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण समजून आले.
पोलिसांच्या या कारवाईबद्दल नागरिकांमधून नाराजी दिसून आली. पोलीस आणि नागरिक मध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र होते. सोलापुरात असे अचानक झाल्याने नागरिक सुद्धा घाबरल्याच्या अवस्थेत पाहायला मिळाले. पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या काही लोकांच्या दुचाकी जप्त केल्याची कारवाई केली आहे.