दक्षिणसाठी सचिन चव्हाण यांनी केली भाजपकडे उमेदवारीची मागणी ; सुभाष देशमुखांच्या टेन्शन मध्ये वाढ
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांना आणखी एक धक्का बसला असून त्यांचे कट्टर समर्थक सचिन चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीकडे दक्षिणमधून उमेदवारीची मागणी केली आहे.
राज्यामध्ये बंजारा समाज अतिशय आक्रमक असून यावेळी काही करून समाजाचे जास्तीत जास्त आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात तांड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून सुमारे 40 हजारापेक्षा अधिक मतदार आहेत.
सचिन मोहन चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचा २०१३ पासून सक्रिय कार्यकर्ते आहेत. सध्या ते संत सेवालाल महाराज बंजारा लमाण समृध्दी योजनेचे अशासकीय सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्यांचे आजोबा दलितमित्र, शिक्षणमहर्षी स्व. चंद्राम चव्हाण गुरुजी यांनी १९५८ मध्ये वंचित समाजाला व समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी मागास समाजसेवा मंडळाची स्थापना केली. संस्थेचे २२ शाखांमधून बहुसंख्य शाखा दक्षिण सोलापूर तालुक्यात आहेत.
सध्या संस्थेमध्ये १५,००० विद्यार्थी शिक्षण घेत असून जवळपास ६०० कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेच्या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातुन लाखो विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य केले आहे. आज संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी शासकीय, खाजगी, सामाजिक, औद्योगिक आदी. विविध क्षेत्रात उच्चपदस्थ कार्यरत आहेत.
पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, माझे आजोबा दलितमित्र, शिक्षण महर्षी स्व. चंद्राम चव्हाण गुरुजी व माझे वडील स्व. मोहन चंद्राम चव्हाण यांचा वारसा घेऊन मी आपल्या सामाजिक जीवनाची वाटचाल करीत आहे. गेली १२ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियपणे कार्यरत असून आजपर्यंत पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.
बंजारा समाजाच्या अडीअडचणी तथा समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव तत्पर राहून कार्य केले आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत बंजारा समाजाला कुठेही राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. त्या अनुषंगाने बंजारा समाजाचे धर्मगुरु यांच्यासोबत चर्चा करुन त्यांच्या सुचनेनूसार व बंजारा समाजबांधवांच्या भावना लक्षात घेऊन तसेच राष्ट्रीय बंजारा परिषद व ऑल इंडीया बंजारा सेवा संघ यांच्या पाठींब्याने मी २५१ दक्षिण सोलापूर विधानसभा या मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी ईच्छुक असल्याचे पत्र राज्य नेतृत्वाकडे सुपुर्द केला आहे.