“आमचं ठरलय” भाजपच्या या बॅनरची सध्या सोलापुरात जोरदार चर्चा…
सोलापुरात सध्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात लागलेल्या भाजप नेते चन्नवीर चिट्टे यांच्या बॅनर ची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्कादायक पराभवाला सामोरे गेल्यानंतर, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अंतर्गत वादास सामोरे जाण्याची शक्यता असून, चन्नवीर चिट्टे समर्थकांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी “आमचं ठरलय , लक्ष्य शहर उत्तर विधानसभा” असे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून भाजपचे कमळ चिन्ह टाकून बॅनर लागल्याने विद्यमान आमदार विजयकुमार देशमुखांना ही डोकेदुखी ठरणारी आहे.
कोण आहेत चन्नवीर चिट्टे?
चन्नवीर चिट्टे हे भारतीय जनता पार्टीचे गेल्या ३२ वर्षांपासूनचे जुने, सक्रिय कार्यकर्ते असून, पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे पहिले शहर उत्तर विधानसभेचे आमदार स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांचे स्वीय सहायक होते. त्यावेळी त्यांनी खुप नावलौकिक मिळविला. तेव्हापासून शहर उत्तर मतदारसंघाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. लिंगायत चेहरा असल्याने लिंगायत समाजात मोठा जनसंपर्क व राजकीय कोरी पाटी ही यांची जमेची बाजू मानली जाते, मितभाषी व्यक्तिमत्त्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक वर्षांपासून सक्रियता ,स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू कार्यकर्ता म्हणून असलेली त्यांची ओळख, संघटनेतील सक्रियता व अनेक निवडणुकांमधील कामांचा अनुभव यामुळे यंदा भाजपने भाकरी फिरवायची ठरवली तर विजय देशमुखांच्या ठिकाणी उमेदवारीची माळ यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता मानली जाते.
काय सांगतो शहर उत्तर मतदारसंघाचा आजपर्यंतचा इतिहास
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून भाजपचा बालेकिल्ला मानला जातो,पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा पहिला आमदार 1990 साली स्व.लिंगरज वल्याळ यांच्या रूपाने भाजपला मिळाला,या नंतर अनुक्रमे 1995 साली भाजपा, 1996 साली पोटनिवडणुकीत नरसिंग मेंगजी,2004 ते 2019 सलग चार वेळा विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत विजय मिळविला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे या मतदारसंघात मोठे जाळे असून,हिंदुत्ववादी विचारांची मोठी व्होट बँक या ठिकाणी भाजपच्या यशाचे मोठे कारण मानले जाते. मात्र यंदा गुजरात पॅटर्न राबविले जाण्याची शक्यता असल्याने सलग ४ वेळा आमदार असलेल्या विजयकुमार देशमुख यांची वयोमर्यादा व गुजरात पॅटर्न राबविला गेला तर त्यांच्या ठिकाणी चन्नवीर चिट्टे यांना संधी मिळेल अशी जोरदार चर्चा आहे.