सीईओ मनीषा आव्हाळे यांचा शिक्षक संघटनेने केला सत्कार ; केंद्रप्रमुख पदोन्नती लवकरच
सोलापूर – नुकतेच सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने मुख्याध्यापक बदली, मुख्याध्यापक पदोन्नती, समायोजन बदली, विनंती बदली प्रक्रिया, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देणे आदी प्रक्रिया टप्प्याटप्याने पद्धतशीरपणे व पारदर्शकपणे राबविण्यात आली.
यात बहुतांश शिक्षकांची बऱ्यापैकी सोय झाल्याने जिल्ह्यातील शिक्षक समाधान व्यक्त करीत आहेत. तळागाळातील सामान्य शिक्षक या प्रक्रियेचे कौतुक करीत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया अद्याप राबवली नसून या प्रक्रियेविषयी ते सोलापूर जिल्हा परिषदेकडून मार्गदर्शन घेत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने या प्रक्रियेचे मुख्य मार्गदर्शक तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा यथोचित सत्कार करून आभार मानण्यात आले. यावेळी आव्हाळे यांनी शिक्षक सुखी व समाधानी असतील तरच शाळेत काम करतील म्हणून शिक्षकांचे उरलेलेही सर्व प्रश्न सोडवले जातील. एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. त्या 18 शिक्षकांनाही केंद्र प्रमुखपदी लवकरच पदोन्नती देऊ असे शिक्षक संघाच्या प्रतिनिधींना सांगितले.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, ” या जिल्हयातील शाळांचा दर्जा उंचावला असून अनेक शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देत खाजगी शाळांनाही मागे टाकले आहेत. त्यामुळे पालकांचा आपल्या पाल्यांचा जि.प. शाळेत प्रवेश घेण्याचा कल वाढलेला दिसून येतो. शाळेची पटसंख्या वाढवा. यंदा शाळेच्या पटनोंदणीत वाढ झाली असली तरी ही वाढ मागील वर्षापेक्षा 1O% अधिक असली पाहिजे. त्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावे. जिल्हा परिषद परिषदेने यूट्यूब चैनल सुरू केले आहे त्यात शिक्षकांनी सहभागी होऊन दर शनिवारी त्याचा लाभ विद्यार्थ्यांना करून द्यावा. शाळेत परसबाग फुलवावे.”
दोन दिवसापूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व शिक्षणाधिकारी मा. कादर शेख यांचेही पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी विनाकारण काही शिक्षक जि.प. आवारात दिसत असतात. त्यांनी जिल्हा परिषदेत न येता मुलांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे. आपली काही कामे असतील तर संघटना प्रतिनिधींमार्फत कळवावे. त्याची तात्काळ सोडवणूक होईल असे सांगितले.
यावेळी प्रशासनाचे आभार मानण्याकरिता महाराष्ट्र राज्य प्रा. शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष म.ज. मोरे, सोलापूर जिल्हा प्रा. शिक्षक संघाचे नेते बब्रुवाहन काशीद, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार व जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे ( डोगे), जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रणजीत थिटे, बाबा शेख, धोत्री सोसायटी संचालक आमसिध्द तीर्थकर, अ. कोट पतसंस्थेचे माजी चेअरमन काशिनाथ विजापूरे, प्रमोद माने, भारतकुमार अंगुले, भिमाशंकर हत्तळी आदी उपस्थित होते.