भाऊ की ताई ! लिंगायत जगदगुरु ही पडले पेचात, नेमका आशीर्वाद द्यायचा कुणाला?
सोलापूर : सोलापूरच्या लोकसभेसाठी दोन युवा आमदारांमध्ये लढत होत आहे. काँग्रेसच्या प्रणिती ताई तर दुसरे भाजपचे राम भाऊ. हे दोन्ही उमेदवार आक्रमक तर आहेतच पण एकमेकांच्या तोडीस तोड पण आहेत. दोघांचीही वक्तृत्व शैली जबरदस्त आहे.
आमदार राम सातपुते यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी लिंगायत समाजाचे नेते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सोबतीने काशी पिठाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचे दर्शन घेतले त्यांना नतमस्तक झाले. यावेळी स्वामीजींनी विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
राम सातपुते यांच्या या भेटीनंतर काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांनी भाजप उमेदवारांना टोला हाणला आहे. उमेद्वारी जाहीर झाल्यानंतर जगदगुरुंची भेट घेवून राजकीय देखावा करण्यापेक्षा लोकसभा निवडणूक जाहीर व्हायच्या आठ दिवसापूर्वी सुशिलकुमार शिंदे यांनी काशी पीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांचे आशिर्वचन घेतले अशी पोस्ट केली आहे.
काही महिन्यांपूर्वी कुंभारी या गावात झालेल्या एका कार्यक्रमात जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांनी सुशीलकुमार शिंदे हेच सोलापूरचा विकास करू शकतात असे सांगून आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करताना यापुढे प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पहायला आवडेल असे वक्तव्य केले होते.
त्यामुळे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य हे सुध्दा नक्कीच पेचात पडले असतील नक्की विजयाचा आशीर्वाद द्यायचा कुणाला? सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची निर्णायक मते आहेत. आणि ती बऱ्यापैकी भाजपच्या उमेदवाराला मिळतात, 2019 मध्ये डॉ जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी मोठे मताधिक्य घेत विजय मिळवला होता त्यात लिंगायत समाजाच्या मतांचा मोठा वाटा होता.