सोलापूर : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळाची बैठक बुधवारी दि. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता डॉ. आंबेडकर चौक येथील नॉर्थकोट मैदानालगतच्या नियोजित उद्यान जागेवर होणार असल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे आणि माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येईल. सन 2022 चा अहवाल सादर करण्यात येणार आहे तसेच वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. दि. 14 एप्रिल पासून डॉ. आंबेडकर जयंती उत्सवात सुरुवात होत आहे. या निमित्ताने जयंती सप्ताहाचे नियोजन करून जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे.
बुधवारी होणाऱ्या बैठकीला सोलापूर शहरातील जयंती उत्सव मंडळे, कामगार संघटना, कलाकार समिती, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, विद्यार्थी संघटना, ज्येष्ठ कार्यकर्ते, आंबेडकर प्रेमी आदींनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन सचिव केरू जाधव यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेत मिलिंद प्रक्षाळे, बाबा बाबरे, विनोद वाघमारे, विजयानंद उघडे, शांतीकुमार नागटिळक, रॉकी बंगाळे, अजित बनसोडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

















