सोलापूर : सोमवारी एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक आंदोलने होतात. या आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. असेच एक आंदोलन झाले ते म्हणजे सोनांकुर कत्तलखान्याच्या विरोधात. या आंदोलनात समाजसेवक रुद्रप्पा बिराजदार, गोसेवक डॉक्टर नवनाथ दुधाळ यांच्यासह गोरक्षक व गोभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषदेसमोरचे उपोषण गेट हे सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर हे आंदोलन गेटवर आले होते. यावेळी एक आगळीवेगळी इनोव्हा कार समोर थांबली होती. त्या कारचे वैशिष्ट्य असे होते की, त्या कारला काच वगळता संपूर्ण बाह्य बाजूने गायीच्या शेणाने सारवले होते.
त्या कार जवळ जाण्याचा मोह पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांना आवरला नाही त्यांनी जाऊन संपूर्ण कारची पाहणी केली आणि याबाबत विचारणा केली. ही कार होती, उस्मानाबाद जिल्ह्यातील दुधाळवाडी इथल्या येडेश्वरी गुरुकुल गोशाळेचे पंचगव्य तज्ञ, समाजसेवक डॉक्टर नवनाथ दुधाळ यांची.
पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी दुधाळ यांना यामागचे कारण विचारले तेव्हा उन्हाळा असल्याने शेणामुळे कारचे तापमान वाढत नाही, उन्हाळ्यात एसीची गरज भासत नाही त्यामुळे कार थंड राहते असे सांगत गायीच्या शेणाचे महत्व किती आहे हे सांगितले. ती कार जाई पर्यंत पोलीस निरीक्षक क्षीरसागर त्या कारला पहातच राहिले.






















