सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातल्या काही कर्मचाऱ्यांनी गंभीर तक्रारी केल्या होत्या. मनीष काळजे यांचा हस्तक्षेपामुळे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर शितल जाधव यांचे निलंबन झाले. त्यांचा आरोग्य विभागाच्या कामकाजात हस्तक्षेप का? असा प्रश्न करत त्यांच्या भीतीपोटी आम्ही कसे काम करायचे असे अनेक आरोप करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेने लेखी पत्र देऊन काळजे यांची तक्रार केली होती. या प्रकरणात काळजे यांची बदनामी होऊन त्यांचे पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्षाचे महत्वाचे पदही रद्द करण्यात आले होते.
या प्रकरणाला आता वेगळे वळण प्राप्त झाले आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी मनीष काळजे यांच्या लेखी तक्रारी केल्या होत्या, त्यातील काही कर्मचाऱ्यांनी तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर शितल जाधव यांच्या दबावाखाली आम्ही हे अर्ज केले असे लेखी दिले आहे तसेच काही कर्मचाऱ्यांनी तर आम्ही काळजे यांना ओळखत नाही त्या अर्जावर आमच्या बोगस सह्या केल्याचेही सांगितले आहे.
या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या खुलासानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये कसा गोंधळ चालतो हे आता समोर आले आहे.
दरम्यान याप्रकरणी प्रतिक्रिया देताना काळजे म्हणाले, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शितल जाधव हे आपल्या गैरकारभारामुळे निलंबित झाले आहेत. त्यांच्या निलंबनाशी आपला कोणताही संबंध नव्हता, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये आपण कोणताही हस्तक्षेप केला नाही हे या खुलाशापत्रांवरून सिद्ध झाले आहे परंतु नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या पत्रामुळे जी माझी बदनामी झाली त्याबद्दल आपण न्यायालयात जाऊन कायदेशीर कारवाई करणार आहे.























