सोलापूर : नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतलेले ज्येष्ठ नेते शरद पवार हे दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या या दौऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यात चांगलीच राजकीय खलबते होण्याची शक्यता आहे.
रविवार सात आणि सोमवार आठ मे रोजी ते सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. रविवारी सकाळी साडेदहा वाजता हेलिकॉप्टर नेते विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर पंढरपूर या ठिकाणी त्यांचे आगमन होईल. सायंकाळी पाच वाजता मोटारने ते सांगोला येथील मेडशिंगी या ठिकाणी जातील. त्या ठिकाणी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावून रात्री साडेआठ वाजता शरदचंद्र पवार प्रशालेच्या ठिकाणी मनोहर सपाटे यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.
रविवारी शासकीय विश्रामगृह सोलापूर या ठिकाणी त्यांचा मुक्काम राहणार आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता सोलापूर विमानतळावरून हेलिकॉप्टरने ते पुन्हा सांगोला येथे जातील. त्या ठिकाणी बाबुराव गायकवाड यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभाला उपस्थित राहणार असून तिथून पुढे ते हेलिकॉप्टरने साताऱ्याकडे प्रयाण करतील.




















