राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी पक्षाने समिती गठीत केली होती त्या समितीच्या बैठकीत पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत आहे. पक्षाध्यक्षपदी त्यांनीच राहावे सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.
‘लोक माझे सांगती’ या राजकीय आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचा अनपेक्षित निर्णय जाहीर केला. याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. पवार साहेबांनी नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी समिती गठीत केली. या समितीची आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला की, खा. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत आहे.
पक्षाध्यपदी पवार साहेबांनीच राहावे अशी विनंती सर्वानुमते करण्यात येत आहे. हा ठराव पवार यांची भेट घेऊन त्यांच्या समोर मांडण्यात येईल. त्यावर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
देशाला, राज्याला, पक्षाला पवार यांची गरज आहे. पक्षाचे आधारस्तंभ तुम्हीच आहात. त्यामुळे पवार साहेबच पक्षाध्यक्षपदी असावे, अशी सर्वांची भावना असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
















