सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे एक महिन्याच्या आयएएस ट्रेनिंग साठी मसूरीला जाणार आहेत. त्यांचा 24 दिवसांचा ट्रेनिंग कालावधी आहे, त्यांचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे देण्यात आला आहे. शनिवारी शंभरकरांनी ठोंबरे यांच्याकडे चार्ज सोपवला.
मसुरी येथील लालबहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये ८ मे ते २ जून या कालावधीत चौथ्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी देशभरातील आयएएस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून १८ आयएएस अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे दोन वेळा मसुरी येथे आयएएस प्रशिक्षणासाठी गेले होते.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना 20 जानेवारी 2023 रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांची बदली होईल अशी वारंवार चर्चा ऐकण्यास मिळते परंतु पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी शंभरकर यांची कामकाजाची ट्युनिंग चांगली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना आणखी काही महिने मुदतवाढ मिळाल्याची शक्यता आहे.
अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी 18 नोव्हेंबर 2022 रोजी पदभार घेतला होता. सहा महिन्यातच त्यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आला. ते तिसऱ्यांदा लकी ठरले आहेत. यापूर्वी ठोंबरे यांनी बीड जिल्ह्याच्या कलेक्टर पदाचा दोन वेळा अतिरिक्त पदभार त्यांनी सांभाळला होता. त्यांनी सोलापूर जिल्ह्यात चार वर्ष कामकाज केले आहे त्यामुळे त्यांना सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे.



















