सोलापूर : लोकशासन आंदोलन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक मेपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सोलापूर ऑफिसर क्लब मधील तत्कालीन वादग्रस्त अधिकारी धनराज पांडे, सतीश जगताप, हमीद नाईकवाडी यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे होत आहे.
पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ दिंडोरे व जिल्हा कार्याध्यक्ष मारुती जाधव यांनी हे आंदोलन सुरू केले असून त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये ऑफिसर क्लब च्या खात्यावर असलेले 4.50 कोटी रुपये या तिन्ही अधिकाऱ्यांनी हडपले आहेत असा आरोप करण्यात आला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारी अर्ज तसेच धर्मादाय आयुक्त व मुख्य न्यायाधीश शब्बीर आवटी यांच्याकडे केलेले आहेत मात्र अजूनही चौकशी का होत नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे द्यावा अशी मागणी त्यांची आहे. या आंदोलनाला शहरातील विविध संस्था संघटनांनी पाठिंबा दिला आहे.



















