सोलापूर : काँग्रेस पक्षाने कर्नाटक राज्यात एकहाती सत्ता मिळवली, त्याबद्दल काँग्रेस कार्यकर्ते देशात जल्लोष करीत आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पक्षाने दावनगिरी या भागाची जबाबदारी दिली होती, त्याठिकाणी 8 पैकी 6 जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत.
त्या निमित्ताने सोलापुरात रविवारी शहर काँगेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जनवात्सल्य निवासस्थानासमोर जोरदार जल्लोष करण्यात आला, फटाक्याची आतिषबाजी करत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांचा मोठा हार घालून सत्कार करण्यात आला.
सुशिलकुमार शिंदे यांनी यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांचेही अभिनंदन केले, काँग्रेसचा चेहरा सर्वधर्म समभावचा आहे, आम्हाला 105 जागांची अपेक्षा होती मात्र 139 जागा निवडून देऊन कर्नाटकच्या जनतेने भाजपला हाकलून लावले आहे, कर्नाटकात हुकुमशाही चालली नाही आता देशातही परिवर्तन अटळ असल्याची भूमिका त्यांनी मांडत ‘दावणगिरी होल बीडरी’ म्हणत त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे माईक सरसावले.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा हा विजय आहे, त्यांची यात्रा ज्या 14 जिल्ह्यातून गेली तिथे वन साईड काँग्रेसने विजय मिळवला आहे. कर्नाटकात जनतेने दाखवून दिले की काँग्रेसच किंग आहे, काँग्रेसला एकहाती सत्ता दिल्याबद्दल मी संपूर्ण जनतेचे आभार मानते, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराच्या विरोधातला हा विजय असल्याचे त्या म्हणाल्या.


















