सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे सोलापूर जिल्ह्यात दौरे वाढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूर लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे केलेल्या मागणीनंतर शिंदे साहेब आणखीच सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
याच पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील सत्ता स्थापनेसाठी सुशीलकुमार शिंदे यांची निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. कर्नाटक विजयानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना हा देश गोरगरिबांचा असल्याचे सांगत भाजपवर टीका केली होती. दरम्यान सोमवारी भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता पत्रकारांनी त्यांना घेराव घालत विविध विषयावर छेडले.
याचवेळी आगामी लोकसभेचा विषय निघाला. तेव्हा सर तुम्हीही इच्छूक आहात की, असे विचारले असता त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली. चार वर्षानंतर शिंदे साहेबांना सोलापूरचा पाणी प्रश्न आणि विमान तळाचा विषय आठवतोय आणि हेच नेते आता देश गरीबाचा आहे म्हणून सांगतात त्यांना मर्सिडीज मध्ये बसून ही प्रतिक्रिया देणे शोभत नाही अशा भाषेत बोचरी टीका केली. याप्रकरणी त्यांनी अधिक बोलणे टाळले.


















