सोलापूर : गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथे कडबा घेऊन जाणाऱ्या टेम्पोला विजेच्या ताराचा धक्का लागल्याने झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून एक हजार कडब्यासह टाटा टेम्पो जळून खाक झाला आहे. रविवार दिनांक 21 मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास कारंबा येथून गुळवंची मार्गे मंगळवेढा येथे जाणाऱ्या टाटा कंपनी च्या 407 टेम्पो क्रमांक एम एच 11 एस 3382 या टेम्पोला विजेचा ताराचा धक्का लागल्याने टेम्पोतील कडबा पेंड्यांनी पेट घेतला त्यामुळे क्षणातच टेम्पोला आगीने वेडा टाकला.
आग विझवण्याचा प्रयत्न करण्याआधीच आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला आहे. टेम्पोतील कडब्याचा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने घर्षणामुळे ही आग लागल्याची माहिती टेम्पोचे मालक व ड्रायव्हर भीमराव मिटकरी यांनी दिली असून यामुळे आपले लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची खंत मेटकरी यांनी व्यक्त केली आहे. गुळवंची गावापासून काही अंतरावर ही घटना घडली असल्याने आग विझवण्यासाठी कोणताच प्रयत्न करता आला नाही. त्यामुळे होणारे नुकसान डोळ्याने पाहण्याची वेळ बघणार्यावर आली होती.



















