सोलापूर : सोलापुरात शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत महा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या चौथ्या दिवशी शहरातील आमदारांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते व आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत होणार होते.
केवळ ज्येष्ठ आमदार माजी मंत्री सुभाष देशमुख व काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी या उद्घाटन कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार सैपन नदाफ, गटविकास अधिकारी महेश पाटील यांचे प्रमुख उपस्थिती होती.
पहिले संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र हे दोन्ही हाताने दिव्यांग असलेल्या लक्ष्मी संजय शिंदे या विद्यार्थिनीला देण्यात आले. लक्ष्मी सोबत तिची बहीण प्रमाणपत्र घेण्यासाठी आली होती आमदार सुभाष देशमुख यांनी लक्ष्मीची संवाद साधला. “तू दोन्ही हात नसताना जेवण कसे करतेस, अभ्यास कसा करतेस”, तेव्हा लक्ष्मीने मी सर्व कामे माझ्या पायाने करते असे सांगताच आमदार सुभाष बापू यांनी प्रमाणपत्र पायाने घेणार का? मला तुला शेक हॅण्ड करायचे आहे. तुझा पाय माझ्या हातात देशील का? असे म्हणताच लक्ष्मीचे पाय हातात घेत तिच्या कर्तुत्वाला सलाम केले.
या कार्यक्रमात हा प्रसंग पाहण्यासारखा होता. त्यानंतर दिव्यांग बालकाच्या आईला संजय गांधी निराधार योजना प्रमाणपत्र हातात घेताना डोळे भरून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते. त्यांना सुभाष देशमुख यांनी स्टेजवर न बोलावता खाली जाऊन त्यांच्या हातात प्रमाणपत्र दिले.



















