सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या महाशिबिरात भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्या महाशिबिराची सोलापुरात सध्या चर्चा होत आहे तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने विविध दाखले देण्यासाठी घेतलेल्या महाशिबिराची सुद्धा तितकीच जोरदार चर्चा ऐकण्यास मिळते. जिल्हा प्रशासनाच्या या महाशिबिरात काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार सुभाष देशमुख एकत्र आले होते. बापू लवकर आले ताई मात्र काही कार्यक्रम असल्याने उशिरा आल्या. एकमेकांच्या शेजारी बसून त्यांनी चर्चा केली.
आमदार प्रणिती शिंदे यांनी बोलताना प्रशासनाने सर्वसामान्यांच्या वेदना व दुःख जाणून घेतल्याबद्दल या उपक्रमाचे कौतुक केले. उत्पन्नाचे दाखले मात्र लवकर देण्याची मागणी त्यानी केली. प्रशासन आणि राजकारण ही नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत असे सांगत आमदार सुभाष देशमुख यांना त्यांनी बापू आता निराधारांच्या उत्पन्नाचा दाखल्याची 21 हजाराची अट रद्द करून ती 51 हजारावर करावी यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवून मागणी रेटून धरू अशी विनंती केली.

















