सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहे त्यांच्या उपस्थिती त विविध विकास कामांचे उद्घाटन शासकीय कार्यालयांचा लोकार्पण सोहळा आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचा लोकार्पण सोहळा तसेच महानगरपालिकेच्या वतीने विकसित केलेल्या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. नियोजन भवन येथे शासकीय बैठकीत ते आढावा घेणार आहेत.
दुपारी तीन वाजता हेरिटेज मंगल कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास शहर पदाधिकारी व ग्रामीण जिल्हा पदाधिकारी, ग्रामीण मंडल पदाधिकारी, शहर मंडल पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कार्यकारिणी सदस्य, शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख, बूथ प्रमुख व सर्व प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण व शहर संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी यांनी केले आहे.
नुकताच काँग्रेसचे महाशिबिर संपन्न झाले. कार्यक्रमात माजी शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेत्यांनी भाजपला लक्ष केल्याचे दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे सोलापुरात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.





















