सोलापूर : शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत सोलापूर शहरांमध्ये उत्तर तहसील कार्यालयाच्या वतीने नार्थकोट प्रशालेच्या त्यांनी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापुरात मागील सहा दिवसांपासून या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे.
प्रशासन रात्री उशिरापर्यंत झोकून देऊन काम करत असून एका आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्याला तर मध्यरात्री सव्वा एक वाजता त्याच्या व्हाट्सअप वर दाखला पाठवण्यात आला. सकाळी उठून व्हॉटसअप पाहतो तर काय त्याला आनंदाचा धक्काच बसला.
एवढंच नाही तर या महाशिबिराची सुरुवात सकाळी सात वाजल्यापासूनच होते. सातपासूनच लाभार्थ्यांना दाखले मिळण्यास सुरुवात होतात.
एका दिवसात दाख़ला निर्गमित करण्यासाठी बारा काउंटर लावण्यात आले. सदर बारा काउंटरवर महा-ई-सेवा केंद्रांचे ऑपरेटर्सची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील चार नायब तहसीलदार, चार अव्वलकारकून, पाच सर्कल ऑफ़िसर, पाच लिपिक, सहा तलाठी, दहा कोतवाल व चार ऑपरेटर अशी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आठवडाभर मध्यवर्ती ठिकाणी हा सर्व सेटअप कार्यरत ठेवण्यात आला आहे.
प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार सैपन नदाफ यांच्या नियंत्रणाखाली हे शिबिर सुरू असून दिव्यांग, अंध, अपंग, निराधारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमाणपत्र हातात पडताच अनेकांचे चेहऱ्यावर आनंद तर पहायला मिळतोच मात्र काहींचे डोळे सुद्धा पाणावल्याचे चित्र आहे.
























