सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुरुवारच्या सोलापूर दौऱ्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस विशेष करून शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
एक फोटो मात्र सध्या सोलापुरात चर्चेचा विषय बनला आहे. तो म्हणजे सोलापूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेल्या भेटीचा. विशेष म्हणजे तो फोटो फडणवीस यांनी आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केल्याने याची आणखीच चर्चा वाढली आहे.
दुपारी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकार्पण सोहळया त्यानंतर हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण केल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास फडणवीस हे माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या होटगी रोडवरील निवासस्थानी जेवायला गेले होते. त्याठिकाणी सुभाष देशमुख त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख सह संपूर्ण देशमुख परिवाराने फडणवीस यांचे आदरातिथ्य केले. या ठिकाणी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीनंतर सोलापुरात या फोटोची चर्चा होत आहे. यावर वाघमारे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की, मी फडणवीस यांच्या दौऱ्यात होतो त्यांच्यासोबत सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी गेलो असता हॉलमध्ये त्यांची भेट घेतली. ही सहज भेट होती त्यामागे कोणतेही कारण नव्हते. राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने ते कोणालाही भेटू शकतात असे वाघमारे म्हणाले. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.




















