सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवकांसह बऱ्याच कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. भाजपचा तो उत्साह जास्त दिवस टिकला नाही केवळ सात दिवसातच एक भाजप मध्ये गेलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पुन्हा स्वगृही परतला आहे.
त्या कार्यकर्त्यांचे नाव आहे, रुपेशकुमार भोसले. भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व्हीजेएनटी विभागाचे शहराध्यक्ष होते. राष्ट्रवादीमध्ये चाललेल्या कारभारावर नाराज होऊन त्यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला.
रुपेश कुमार भोसले हे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुग्णसेवक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कोरोना काळामध्ये अनेकांचे प्राण वाचवले, अडचणीत मदत केली त्यामुळे त्यांच्या कामाची कायम प्रशंसा होत आली. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा आणि त्यांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता पक्ष सोडून जाणे हे राष्ट्रवादीला परवडणारे नव्हते.
गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी रुपेशकुमार भोसले यांना बोलून त्यांची नाराजी घालवण्याचा प्रयत्न केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीतच भोसले यांनी भाजपला सोडून पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ पुन्हा हातात बांधले.



















